
अहवाल
अहवाल सादर करण्यात येतो की आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी सकाळी नऊ तीस वाजता महाविद्यालयातील समुपदेशन समितीच्या वतीने सेमिनार हॉलमध्ये जामनेर शहरातील नामांकित योगशिक्षक श्रीमती ममता शर्मा यांचे “हर घर ध्यान” या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. प्रथम प्रस्ताविक करताना प्रा. आर.यु. जाधव यांनी म्हटले की आजचे युग हे ताण-तणावाचे युग आहे आणि या ताणतणावाच्या युगात प्रत्येकाला आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळणे अत्यंत कठीण झाले आहे. प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दडपण आहे. अशावेळी जर आपण नियमितपणे प्राणायाम केले तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात नक्कीच सुधारणा होईल आणि आपली कार्यक्षमता ही वाढेल.
या कार्यक्रमाच्या दरम्यान श्रीमती ममता शर्मा (योगशिक्षक) यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह योगाचे, ध्यान-धारणेचे आणि प्राणायामाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वतः प्राणायामाचा अनुभवही घेतला.
या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ.प्रज्ञा साठे यांनी देखील विद्यार्थ्यांना नियमितपणे प्राणायाम करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी व्यक्तिशः भेटून असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा महाविद्यालयात आयोजित केले जावेत अशा प्रकारची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागातील प्रा. डॉ.अरविंद राऊत यांनी केले तसेच डॉ. मनीषा चौधरी यांनी उपस्थिताचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालय परिवारातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.